बांगलादेशातील हिंदू आणि बौद्धांवर मुस्लिम कट्टरवाद्यांकडून सातत्याने हल्ले केले जात आहे. घरांबरोबरच मंदिरे, मठ, हिंदू प्रतिके आणि समाजमंदिरांना लक्ष्य केले जात आहे. काही ठिकाणी तर हिंदूंच्या हत्या झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. हिंदुंविरोधातील या हिंसाचाराचा जगभरातून निषेध केला जात असून, मंगळवारी (दि.१०) राज्यभरातही हिंदू रक्षा मोर्चे काढण्यात आले आहे .
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दिनांक १०) पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यात हिंदुत्ववादी संघटनांनी लक्षवेधी आंदोलने केली. तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदन देत बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला. भारत सरकारने तातडीने याबद्दल कारवाई करावी, तसेच बांगलादेश सरकारने हिंदुंच्या रक्षणासाठी कठोर पाऊले उचलावीत असे आवाहन करण्यात आले आहे . पुणे शहरात बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली. कोंढव्यात हिंदू रक्षा ठिय्या आंदोलन तर अनेक ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश आंदोलने करण्यात आली.
बांगलादेशातील सत्ताबदलानंतर अल्पसंख्यांक हिंदू आणि बौद्ध समाजावरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी मठ आणि मंदिरे उध्वस्त करण्यात आली असून, जिहाद्यांकडून हिंदूंची हत्यादेखील करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचे याकडे लक्ष वेधावे, तसेच बांगलादेश सरकारनेही यावर तातडीने कारवाई करावी म्हणून मानवाधिकार दिनानिमित्त राज्यासह देशभरात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली होती. जवळसाप सर्वच ठिकाणी नागरिकांनी निदर्शनांस जोरदार पाठींबा दिला. भारत सरकारने बांगलादेशावर दबाव टाकावा आणि हिंदुंच्या रक्षणासाठी तातडीने पाऊले उचलावीत असा सूर सर्वच आंदोलनांचा होता.
हिंदू रक्षा मोर्चा
पुण्यातील गंज पेठेतील लहुजी वस्ताद साळवे तालीमपासून ६०० हिंदू बांधवांनी बांगलादेशी हिंदूंच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चा काढला. तसेच, पिपरी चिंचवड, वाघोली, औंध, बाणेर, पुण्यातील पेठांचा भाग, सिंहगड, वडगाव शेरी, हडपसर आदी भागांत हिंदू न्याय मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये निषेध रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. तर लासलगावात मूक मोर्चा काढत सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नाशिक शहरात भव्य हिंदू न्याययात्रा काढण्यात आली.