भारताचा डी गुकेश हा इतिहास घडवत बुद्धिबळाच्या पटावरचा राजा ठरला आहे. जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवत त्याने देशासाठी आणि देशवासियांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट दिला आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर गुकेश आता भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे.या ऐतिहासिक कामगिरीनंतर विविध स्तरांमधून डी गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डी गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाअंतिम सामन्यात डिंग लिरेन याच्यावर मात करत ही कामगिरी केली आहे. गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वांत तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने याआधी गॅरी कास्पोरोव्ह याचा विक्रमही मोडला आहे
गुकेशने याआधी वयाच्या 17 व्या वर्षी FIDE ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती. काल चॅम्पियनशिपच्या १४व्या आणि शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली, यात गतविजेता लिरेन याने एक छोटीशी चूक केली, जी त्याला महागात पडली. गुकेशने चीनच्या लिरेनचा 14 डावानंतर 7.5-6.5 अशा गुणांनी पराभव केला. गुकेशच्या आधी 2013 साली भारताच्या विश्वनाथन आनंदने जागतिक बुद्धिबळ विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर ११ वर्षांनी देशाला हा मान पुन्हा मिळाला आहे.
डी गुकेश यांचे पूर्ण नाव डोमराजू गुकेश असून तो मूळचा चेन्नईचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला आहे. त्याने वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले. नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत तसेच ते चेन्नईमध्ये होम चेस ट्यूटर आहेत. त्यांच्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले आहेगुकेशने 2018 मध्ये 12 वर्षाखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती.तर 2018 च्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने 5 सुवर्णपदके जिंकली आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मार्च 2018 मध्ये फ्रान्सची 34 वी ओपन डी कॅपेले ला ग्रांडे बुद्धिबळ स्पर्धा संपल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला गुकेशचे वडील डॉक्टर असून आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.
पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
गुकेश डीचे सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास अभिनंदन केले आहे.आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, “हे त्याच्या अद्वितीय प्रतिभा, कठोर परिश्रम आणि अविचल दृढनिश्चयाचे परिणाम आहेत. गुकेशच्या विजयाने बुद्धिबळाच्या इतिहासात केवळ त्याचे नाव कोरले गेले नाही, तर लाखो तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उत्कृष्टता साध्य करण्यासाठी त्याने प्रेरित केले आहे.”
PM Narendra Modi congratulates Gukesh D on becoming the youngest-ever World Chess Champion.
He tweets, "…This is the result of his unparalleled talent, hard work and unwavering determination. His triumph has not only etched his name in the annals of chess history but has also… pic.twitter.com/09u3vybhlq
— ANI (@ANI) December 12, 2024