पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर सदस्यांनी आज संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या 23 व्या स्मरणदिनानिमित्त सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेमध्ये श्रद्धांजली अर्पण केली आहे .यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, किरेन रिजिजू आणि इतर नेते उपस्थित होते.
13 डिसेंबर 2001 रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमध्ये 9 सुरक्षा रक्षक शहीद झाले तर 16 सुरक्षा रक्षक जखमी झाले. या शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये जगदीश प्रसाद यादव, मतबर सिंग नेगी, नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, बिजेंद्र सिंग, घनश्याम, केंद्रीय राखीव पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी आणि सीपीडब्ल्यूडी कर्मचारी देशराज यांचा समावेश आहे.
नेमके काय घडले त्या दिवशी ?
13 डिसेंबर 2001 हा भारतीय इतिहासातील एक काळा दिवस ठरला होता. आज, शुक्रवारी या घटनेला तब्बल 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण अजूनही अनेकांच्या मनात या आठवणींची जखम कायम आहे. पण भारतीय लोकशाहीवर झालेला हल्ला केवळ ४२ मिनिटांमध्ये सगळे काही हादरवून गेला होता. त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेनंतर सभागृहाचे कामकाज 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानासाठी सभागृह सोडले होते, परंतु लालकृष्ण अडवाणी, प्रमोदी महाजन यांच्यासह अनेक नेते सभागृहातच उपस्थित होते.
11.30ची वेळ होती, तत्कालीन उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे अंगरक्षक त्यांची वाट पाहत होते. त्याचवेळी गेट क्रमांक १२ मधून पांढऱ्या रंगाची ॲम्बेसेडर कार आत शिरली. गाडीवर गृह मंत्रालयाचे बनावट स्टिकर होते. या कारमध्ये 5 दहशतवादी आणि शस्त्रास्त्रांचा साठा होता. गाडी पुढे गेल्यावर सुरक्षा कर्मचारी गाडीच्या मागे धावले. दरम्यान, दहशतवाद्यांची कार उपराष्ट्रपतींच्या कारला धडकली. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडे AK-47, पिस्तूल आणि हँडग्रेनेड होते, तर त्यावेळी सुरक्षा रक्षक निशस्त्र होते. गोळ्यांचा आवाज ऐकून सीआरपीएफची बटालियन सक्रिय झाली. उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले. सर्व गेट लगेच बंद करण्यात आले. संसदेत उपस्थित असलेले सर्व मंत्री, खासदार आणि अधिकाऱ्यांना आत सुरक्षित राहण्यास सांगण्यात आले आहे.
एका दहशतवाद्याने गेट क्रमांक 1 मधून संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथे सुरक्षा जवानांनी त्याला ठार केले. यावेळी त्यांच्या शरीराला जोडलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. आता सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती.लोकशाहीचे मंदिर आता रणांगण बनले होते. इतर चार दहशतवाद्यांनी गेट क्रमांक 4 मधून सदनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षा जवानांनी तिघांना ठार केले. एक दहशतवादी गेट क्रमांक 5 च्या दिशेने धावला तेव्हा सुरक्षा जवानांनी त्याला गोळ्या घातल्या. ही चकमक साडेचार तास सुरू होती.यथावकाश सुरक्षा जवानांनी पाचही दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती.
नंतर दिल्ली पोलिसांनी या दहशतवादी हल्ल्याचा तपास केला आणि हा हल्लाआणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला त्याचे साथीदार एसएआर गिलानी, अफशान गुरू आणि शौकत हुसेन यांच्यासह अटक करण्यात आली.
काही काळाने झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने गिलानी आणि अफशानची निर्दोष मुक्तता केली, तर अफजल गुरूला फाशीची शिक्षा सुनावली. शौकत हुसेनची फाशीची शिक्षा 10 वर्षांच्या तुरुंगवासात कमी करण्यात आली आणि 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफजल गुरूला दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.