राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. सावरकरांबद्दल एका सदस्याच्या प्रश्नावर आज राहुल गांधी म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती, असे त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी सांगितले होते.
लोकसभेत महाराष्ट्राचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींना सावरकरांबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर राहुल गांधी यांनी आपली बाजू मांडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
त्यावर सभापतींनी राहुल गांधींना बोलण्याची संधी दिली. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी त्यांना सांगितले होते की सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली आणि तडजोड केली. मात्र याबाबत हल्लाबोल करत भाजप नेते निशिकांत दुबे म्हणाले की, राहुल गांधी सावरकरांबद्दल सभागृहात खोटे बोलले आहेत. त्यांच्या आजीने म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सावरकरांच्या नावाने टपाल तिकीट काढले होते. त्यांच्या नावाने बांधलेले स्मारक दान केले आणि त्यांनी सावरकरांना पाठिंबा दिल्याचे अनेक प्रसंग आहेत.
आपल्या भाषणाची सुरुवात करत असताना राहुल गांधी यांनी एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात मनुस्मृतीची प्रत घेऊन भाजपाचे नेते सावरकरांचा अपमान करत आहेत, असे वक्तव्य केले आहे. कारण सावरकर यांनी आपल्या लिखाणात लिहिले होते की, संविधानात भारतीय असे काहीही नाही. आपल्या संविधानाची जागा मनुस्मृतीने घ्यावी.सावरकरांनी सुद्धा संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचे स्थान दिले होते मग आज भाजपाचे नेते संविधानाचे कौतुक करत सावरकरांचा अपमान करत आहेत. असे म्हणत राहुल गांधींनी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे.