बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले आहे .मात्र या विषयाचे राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुचवले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात होतील. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. मात्र विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे .विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे .
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती तर दुसरीकडे परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली होती. याप्रकरणी आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत परभणीत आंदोलन केले होते. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही करण्यात आली होती. या दोन्हीही घटनेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिवाळी अधिवेशनात भाष्य केले आहे .
संविधानाचा अपमान कधीच सहन करणार नाही,
बीड-परभणीसारख्या गंभीर घटनांचे राजकारण करणे अयोग्य…(विधानसभा, नागपूर | दि. 16 डिसेंबर 2024)#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024 pic.twitter.com/qfqEa00fyN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली आहे. या गंभीर हत्येत राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची येथील गावकऱ्यांना शंका असल्याचेही दानवे यांनी सभागृहात सांगितले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही दानवे यांनी आज परिषद सभागृहात केली आहे . यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे .