गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच खाली येताना दिसत आहे.देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. काश्मीरमध्ये थंडीचे प्रमाण आता थोडे कमी झाले असले तरीही इथे पारा मात्र शून्य अंशांवर स्थिरावणार असल्याचा अंदाज असल्यामुळे या भागातून देशाच्या उर्वरित क्षेत्रांकडे वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य भारतासह महाराष्ट्रही पुरता गारठणार आहे. महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मागील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण पट्ट्यासह उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे. ज्यामुळं राज्यात ही थंडीची लाट मुक्काम वाढवताना दिसेल. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील किमान तापमान घसरले आहे. सध्याच्या घडीला निफाडमध्ये पारा 6 ते 7 अंशांदरम्यान असतानाच सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद धुळे येथे करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या धुळे, निफाड, अहिल्यानगर, परभणी, गोंदिया, नागपूर, वर्धा, आणि बुलढाणा इथे तापमान 10 अंशांहूनही कमी असून, कोकणातील रत्नागिरीमध्ये राज्यातील सर्वाधिक 34.8 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला निफाडमध्ये पारा 6 ते 7 अंशांदरम्यान असतानाच सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद धुळे येथे करण्यात आली आहे. इथे तापमान 4.1 अंशांवर असून, ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पंजाब आणि मध्य प्रदेशातही सध्या थंड वारे वाहत आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगालचे गंगा मैदान, बिहार, महाराष्ट्राचे विदर्भ, सौराष्ट्र आणि गुजरातचे कच्छ या भागात थंडीची लाट पसरली आहे. दक्षिण आणि किनारी भारताव्यतिरिक्त इतर भागांना थंडीने वेढले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान मायनसमध्ये आहे. झोजिला येथे मायनस २२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्याच वेळी, श्रीनगरमध्ये मायनस ३.४, पहलगाममध्ये मायनस ४.०, गुलमर्गमध्ये मायनस ३.८ तापमान नोंदवले गेले.आयएमडीच्या माहितीनुसार 21 डिसेंबरपर्यंत काश्मीरमध्ये खोऱ्याच्या भागात हवा कोरडीच राहणार असून, यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.