राजस्थानच्या भजनलाल शर्मा सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज जयपूरमध्ये आयोजित “एक वर्ष – परिणाम उत्कर्ष” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजपची डबल इंजिन सरकारे सुशासनाचे प्रतीक बनत आहेत. ते म्हणाले की, राजस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी डबल इंजिनचे सरकार अहोरात्र मेहनत घेत आहेत .
पंतप्रधानांनी या कार्यक्रमादरम्यान ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाण्याशी संबंधित 46,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 24 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे राजस्थानमधील पाण्याच्या आव्हानावर कायमस्वरूपी तोडगा निघेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकल्पांमुळे राजस्थान हे देशातील सर्वात जोडलेल्या राज्यांपैकी एक होईल. त्यामुळे राजस्थानमधील गुंतवणुकीला चालना मिळेल. रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील.
राजस्थानचे पर्यटन, शेतकरी आणि तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे असे सांगत मोदी म्हणाले आहेत की, भाजप कोणताही संकल्प करतो, तो पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आज देशातील जनता भाजपच सुशासनाची हमी असल्याचे सांगत आहे. त्यामुळेच आज एकामागून एक राज्यात भाजपला एवढा मोठा जनसमर्थन मिळत आहे. भाजपला देशाने सलग तिसऱ्यांदा लोकसभेत देशसेवेची संधी दिली आहे. गेल्या 60 वर्षांत भारतात असे घडले नव्हते.
राजस्थानच्या भजनलाल शर्मा सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान अभिनंदन करत म्हणाले आहेत की, या पहिल्या वर्षाने एक प्रकारे आगामी अनेक वर्षांचा भक्कम पाया रचला आहे.आजचा उत्सव हा सरकारला एक वर्ष पूर्ण करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो राजस्थानच्या विकासाचा उत्सव आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नद्या एकमेकांशी जोडण्याच्या संकल्पनेचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागात पोहोचवणे हा यामागचा उद्देश होता. त्यामुळे पूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्या सोडवणे शक्य झाले. सुप्रीम कोर्टानेही त्याला समर्थन दिले होते. पण त्यावर तोडगा काढण्याऐवजी काँग्रेसने मात्र नेहमी राज्यांमध्ये पाण्यावरून झालेल्या वादांना प्रोत्साहन दिले आहे.असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.