डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्ष भाजपवर बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना भाजपने मात्र काँग्रेसवर वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे. खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनीच मीडियासमोर येऊन बाबासाहेबांचा अपमान करण्याचे स्वप्नातही बघता येणार नाही, असे सांगितले आहे . ते म्हणाले आहेत की, काँग्रेस सुरुवातीपासून बाबासाहेब आणि संविधानाचा अपमान करत आहे.
या मुद्द्यावरून संसदेपर्यंत गेले २ दिवस विरोधक गोंधळ घालत आहेत. आज सभागृह सुरू झाले आणि गदारोळ झाला. हाणामारीही झाली. यात भाजपचे दोन नेते जखमी झाले आहेत , भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी झाले आहेत . त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी म्हणाले, “”मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि त्यांनी माझ्याजवळ उभ्या असलेल्या खासदाराला धक्का दिला आणि ते माझ्यावर पडले त्यामुळे मी खाली पडलो. यानंतर त्यांना डोळ्याजवळ दुखापत झाली आहे.
मात्र हा आरोप फेटाळत धक्काबुक्कीच्या मुद्द्यावर राहुल गांधी म्हणाले आहेत की , भाजप खासदार त्यांना संसदेत जाण्यापासून रोखत होते.भाजप खासदारांनी मला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला तसेच ते मला धमक्या देत होते,
दरम्यान पंजाबच्या फरूखाबादचे खासदार मुकेश राजपूत देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुकेश राजपूत यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर खासदार प्रतापचंद्र सारंगी यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान केंद्रीय मंत्री गिरीराज किशोर यांनी घटनेची निंदा करत आजचा दिवस संसदीय इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हंटले आहे. तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी या घटनेची कठोर निंदा केली आहे . संसद हे लोकशाहीचे मंदिर असून इथे गुंडागर्दीला स्थान नसल्याचे रिजीजू यांनी म्हंटले आहे.
यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यावरून खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे .