मुंबईच्या गेट-वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा गुहेला जाणाऱ्या बोटीचा काल अपघात झाला आहे . या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 झाल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण दलांकडून रेक्स्यू ऑपरेशन सुरु असून या दुर्घटनेतून 101 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यात 3 नौदलाचे जवान असून 10 नागरिक आहेत. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे .
प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलिस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचावकार्यात नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉफ्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. अधिक माहितीनुसार, संबंधित स्पीड बोट नौदलाची असून त्याला नवीन इंजिन लावण्यात आले होते. त्याची चाचणी सुरू होती. त्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
यासंदर्भातील माहितीनुसार, उरण, कारंजाजवळ ‘नीलकमल’ ही फेरीबोट उलटली आहे. नौदल, तटरक्षक दल, यलोगेट पोलिस स्टेशन आणि स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बोटीमधील 101 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तसेच या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाकडे जाण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरुन नीलकमल नावाची बोट निघाली होती. यावेळी समुद्रातून दुसऱ्या बाजूने एक स्पीडबोट जात होती. यावेळी त्या स्पीडबोटचे नियंत्रण सुटल्याने ती बोट सरळ फेरीच्या बोटीवर येऊन जोरात आदळली. त्यामुळे फेरीची बोट बुडाली. मुंबईतील बोट दुर्घटनेबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. पीएमओ कडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत मिळणार आहे.तर जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुक्रम विधानसभा आणि विधान परिषदेत माहिती दिली आहे.अपघातानंतर बचावकार्य राबविण्यासाठी आवश्यक ते निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले आहे .तर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली व बचावकार्याबाबत निर्देश दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले आहे.