जयपूरमधील भानक्रोटा परिसरात अजमेर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टँकरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
राजस्थानची राजधानी जयपूरमधील भांक्रोटा पोलीस स्टेशन हद्दीतील अजमेर रोडवर असलेल्या पुष्पराज पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी केमिकल टँकरचा स्फोट झाला असून भीषण आग लागली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.मात्र मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर ३० च्या दरम्यान संख्या असलेल्या भाजलेल्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टँकरमधील स्फोटानंतर रसायन रस्त्यावर सुमारे 500 मीटरपर्यंत पसरले. त्यामुळे अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रसायनामुळे एक कारखानाही जळाला आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
जयपूरचे डीएम जितेंद्र सोनी याबाबत अधिक माहिती दिली असून ते म्हणाले आहेत की, ‘या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 40 वाहनांना आग लागली. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून मदतकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आली असून केवळ 1-2 वाहने या घटनेतून बचावली आहेत. सुमारे 23-24 जण जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जखमींना भेटण्यासाठी एसएमएस हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. जखमींना पाहण्यासाठी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा रुग्णालयात पोहोचले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जयपूर दुर्घटनेवर शोक व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे “मी हॉस्पिटलला भेट दिली आणि सर्व जखमींना दाखल करण्याच्या सूचना दिल्या. सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. आम्ही एक हेल्पलाइन जारी केली आहे. ही दुःखद घटना आहे.
टॅंकरचा स्फोट झालेल्या ठिकाणी अतिशय भीषण वातावरण असून प्रशासकीय कर्मचारी जळालेल्यांना रुग्णालयात नेत आहेत. परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला होता. . आग इतकी भीषण होती की तीनशे मीटरच्या परिघात अनेक वाहने त्यात अडकली. चार जण जागीच जिवंत जाळले. अनेक वाहनचालक दगावल्याचे वृत्त आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्यात व्यस्त आहेत.
दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, महामार्गावरून जाणारी एलपीजी गॅस पाइपलाइन बंद करण्यात आली आहे. टँकरमधील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा. पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.