संसदेबाहेर झालेल्या गदारोळाच्या घटनेनंतर राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे आता राहुल गांधी यांचे निलंबन देखील होण्याची शक्यता आहे असे सांगितले जात आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यसभेतील भाषणाची अर्धवट क्लिप बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा आरोप करत खासदार दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राहुल गांधींना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात निशिकांत दुबे म्हणाले आहेत की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाचा संपादित व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींनी राजकीय दिवाळखोरीचा आणखी एक पुरावा दिला आहे.राहुल गांधींचे हे कृत्य जनतेच्या भावना भडकावण्याचा आणि संसदेची आणि देशाची प्रतिष्ठा कमी करण्याच्या उद्देशाने असल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी अमित शाह यांचे संसदेतील भाषण संपादित करून विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला आहे .संसदेची प्रतिष्ठा कमी करणे आणि अमित शाह यांची बदनामी करणे हा त्याचा उद्देश होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांनी संसदीय विशेषाधिकारांचे उल्लंघन आणि सभागृहाचा अवमान केल्याचा गुन्हा केला आहे. भाजप खासदाराने लोकसभा अध्यक्षांकडे राहुल गांधी यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची आणि विशेषाधिकार समितीच्या चौकशीपर्यंत संसदेतून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.जॉर्ज सोरोसला खूश करण्यासाठी राहुल गांधी संसदीय गैरवर्तन करत असल्याचा दावा दुबे यांनी केला आहे. संसदेच्या अधिवेशनापूर्वी सरकार किंवा वैधानिक संस्थांना लक्ष्य करण्यासाठी मुद्दाम ‘बनावट’ लेख प्रकाशित केले जातात आणि काँग्रेस नेते महत्त्वाच्या संस्थांची बदनामी करण्यासाठी त्यांचा वापर करतात, हा योगायोग नसल्याचे दुबे यांनी म्हंटले आहे.
अमित शहा यांनी राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान भाषण केले होते. काँग्रेसने अमित शाह यांच्या भाषणाची एक छोटी क्लिप सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्यावर डॉ आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस पक्षावर त्यांच्या भाषणाचा विपर्यास केल्याचा आरोप केला होता. . या मुद्द्यावरून गुरुवारी संसद भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार आमनेसामने आले, यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत भाजपचे 2 खासदार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनाक्रमानंतर राहुल गांधींवर आरोप ठेवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.