कुवेतचे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह (Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah) यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी २१-२२ डिसेंबर २०२४ रोजी कुवेतला भेट देणार आहेत. जिथे ते कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.आणि कुवेतच्या अमीरचे विशेष पाहुणे म्हणून २६ व्या अरेबियन गल्फ कपच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधानांच्या कुवेत दौऱ्यावरील विशेष माहिती देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (सीपीव्ही आणि ओआयए), अरुण कुमार चॅटर्जी यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची थोडक्यात माहिती देत दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांवर प्रकाश टाकला आहे आणि “दोन्ही देशांमधील उत्कृष्ट राजकीय संबंध” असे वर्णन केले आहे.
“४३ वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा कुवेतला हा पहिलाच दौरा असणार आहे. “पंतप्रधान मोदींना बायान पॅलेस (कुवैत अमीरचा मुख्य राजवाडा) येथे औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल, त्यानंतर ते कुवेतचे अमीर आणि कुवेतचे युवराज सबा अल-खालिद अल-सबा यांच्याशी स्वतंत्र बैठका घेतील. त्यानंतर कुवेतच्या पंतप्रधानांशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करतील अशीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
या द्विपक्षीय चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदी कुवेतच्या नेतृत्वासोबत, राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संस्कृती आणि दोन्ही देशांचे परस्पर हितसंबंध यासारख्या क्षेत्रांसह द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी आवश्यक पावलांचा आढावा घेतील. क्राउन प्रिन्स माननीय पंतप्रधानांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित करतील.
पंतप्रधानांच्या या ऐतिहासिक भेटीमुळे भारतात एक नवीन अध्याय उघडेल आणि द्विपक्षीय संबंध निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. यामुळे केवळ विद्यमान क्षेत्रात भागीदारी मजबूत होईलच असे नाही तर भविष्यातील सहकार्यासाठी नवीन मार्ग उघडतील, आपल्या सामायिक मूल्यांना बळकटी मिळेल आणि भविष्यासाठी एक मजबूत आणि गतिमान भागीदारी निर्माण होईल. यामुळे भारत आणि गल्फ कोऑपरेशन कौन्सिलमधील संबंधांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
भारत आणि कुवेत दोन्ही देशांमध्ये उत्कृष्ट राजकीय संबंध आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच या वर्षी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या सत्रादरम्यान कुवेतच्या क्राउन प्रिन्सची भेट घेतली होती .
यापूर्वी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये कुवेतला भेट दिली होती. कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल हय्या यांनी अलीकडेच ३-४ डिसेंबर रोजी भारताला भेट दिली होती. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी यापूर्वी या वर्षी सप्टेंबरमध्ये रियाधमध्ये झालेल्या भारत गल्फ कोऑपरेशन कौन्सिल स्ट्रॅटेजिक डायलॉगच्या उद्घाटनादरम्यान भेट घेतली होती.
“अलीकडील उच्चस्तरीय चर्चा खूप यशस्वी झाल्या आहेत आणि इतर मंत्रिस्तरीय बैठकींमुळे भारत आणि कुवेतमधील द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली आहे,” असे परराष्ट्र सचिवांनी सांगितले आहे .
सहकार्याची संस्थात्मक यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी, या वर्षी डिसेंबरमध्ये कुवेतच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान संयुक्त आयोग स्थापन करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला. या आयोगाचे नेतृत्व दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री करतील. आयोगाच्या अंतर्गत व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान, कृषी, सुरक्षा आणि संस्कृती या क्षेत्रात नवीन संयुक्त कार्यगट स्थापन केले जाणार आहेत.
“२०२३-२४ या वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार हा १० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त असल्याने भारत कुवेतच्या शीर्ष व्यापारी भागीदारांमध्ये समाविष्ट आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाने विशेष ब्रीफिंग दरम्यान सांगितले आहे .
“कच्च्या तेलाच्या पुरवठ्याच्या बाबतीतही कुवेत भारतासाठी एक विश्वासार्ह ऊर्जा भागीदार आहे. भारतात कुवेतकडूनही गुंतवणूक होत आहे. त्यामुळे आज कुवेत आखाती प्रदेशात भारताच्या प्रमुख भागीदारांपैकी एक आहे,” असे ते म्हणाले आहेत .