पुण्यात वाघोली जवळ एक भीषण अपघात झाला आहे. दारूच्या अवस्थेत भरधाव वेगात असलेल्या डंपरचालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. यात मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे. तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी रात्री रात्री १२ ते १ च्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्याजवळ घडली आहे .
अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी (२२ डिसेंबर) रात्री ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. या पदपथावर एकूण 12 जण झोपले होते. बाकीचे लोक फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. भरधाव डंपरने थेट फूटपाथवर जाऊन झोपलेल्या लोकांना चिरडले. आरडाओरडा ऐकू आल्यावर आजूबाजूचे लोक पीडितांना वाचवण्यासाठी धावले. यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
अपघातानंतर डंपरचालक फरार झाला पण काही तासांतच पोलिसांच्या एका पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी डंपर चालकाचे नाव गजानन शंकर तोट्रे, (26 वर्षे) असे असून तो मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून यात तो दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.