पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्याचे उपमहापौर आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. साहजिकच या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलेले दिसून आले. महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेली असून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी आपापला कार्यभार स्वीकारला आहे. आता सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद वाटपाचा कार्यक्रम राहिला आहे. तो कार्यक्रमही पुढच्या दोन-चार दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्ता स्थापनेदरम्यान एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी अडून बसले होते. मात्र भाजपने त्यांना गृहमंत्री भाजपचाच होणार असे ठणकावले होते. मग आता कुठली नवीन मागणी घेऊन ,किंवा मनातली नाराजी बोलून दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेनी पंतप्रधानांची भेट घेतली का ? अशी शंका कोणाच्याही मनात येणे साहजिकच होते. मात्र या भेटीनंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांची आपण सदिच्छा भेट घेतली आहे . या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत म्हंटले आहे की, “महाराष्ट्रात विक्रमी जनादेश मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘विकसित भारताच्या वाटचालीत राज्याचा योगदानाबाबत मा. मोदीजी यांच्याशी चर्चा करता आली. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे हे दोघेही उपस्थित होते”.
ही सदिच्छा भेट होती. अडीच वर्षात आम्ही लोकाभिमुख सरकार काय असते ते लोकांना दाखवले आणि लोकांनी आम्हाला मान्यता दिली. मात्र यासाठी केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यामागे होते.त्यासाठी आम्ही पंतप्रधानांचे आभार मानले आहेत मात्र आता आमची नवीन इनिंग सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कसा होईल? याचा आम्ही विचार करु. महाराष्ट्रात क्षमता आहे. देवेंद्र फडणवीस, मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा केंद्रातील मोठ्या नेत्यांची भेट घेणार आहोत”, अशी देखील माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.