आपल्या सीमा वाढवण्याचे आणि कर्ज देऊन अनेक देशांच्या जमिनी बळकावण्याचे चीनचे धोरण सर्वश्रुत आहे. मात्र आता चीनने पाणी काबीज करण्याची नवी रणनीती आखली आहे. शेजारी देशाने तिबेटमध्ये जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत धरण प्रकल्पाला मान्यता दिली आहे. तिबेट पठाराच्या पूर्वेकडील यारलुंग झांगबो नदीवर हे धरण बांधले जाणार आहे. या धरणातून चीन 300 अब्ज किलोवॅट तास वीज निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशातील लाखो लोक प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे दोन्ही देशांनी यावर आक्षेप व्यक्त केला आहे.
जगातील सर्वात मोठे धरण, थ्री गॉर्जेस डॅम आधीच चीनमध्ये आहे. या धरणातून सध्या ८८.२ अब्ज किलोवॅट-तास वीजनिर्मिती होते. तिबेटमध्ये नवीन धरण बांधल्यानंतर 3 पट अधिक वीजनिर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यारलुंग झांगबो नदीच का ?
चीनने आपल्या सर्वात मोठ्या धरणासाठी यारलुंग झांगबो नदीची निवड केली कारण या नदीचा 50 किलोमीटरचा भाग 2 हजार मीटर उंचीच्या खाली येतो. त्यामुळे ही भौगोलिक परिस्थिती जलविद्युत प्रकल्पांसाठी आदर्शवत आहेच तसेच अभियांत्रिकी क्षेत्रालाही नवीन आव्हाने मिळणार असून चांगली रोजगारनिर्मितीही चीन सरकारला करता येणार आहे.
भारत-बांगलादेशकडून आक्षेप व्यक्त
चीनच्या या जलविद्युत प्रकल्पामुळे मात्र भारत आणि बांगलादेशमधील तणाव वाढला आहे. या प्रकल्पाबाबत दोन्ही देशांनी अनेक आक्षेप व्यक्त केले आहेत. या प्रकल्पामुळे नदीच्या प्रवाहात बदल होण्याबरोबरच पर्यावरणाची हानी होईल, असे भारत आणि बांगलादेशचे म्हणणे आहे. दोन्ही देशातील लाखो लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर पाण्यावर अधिकार मिळाल्याने शेजारी देशांसोबत चीनचा संघर्ष होऊ शकतो. तसेच सीमावर्ती भागात पूर आणण्यासाठी पाणी सोडण्याचा कुटील डावही चीन आखू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
भारतातील यारलुंग झांगबो नदीचे नाव ब्रह्मपुत्रा आहे. तिबेटमध्ये ती यारलुंग झांगबो नदी म्हणून ओळखले जाते. ही नदी तिबेटमधून भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यात प्रवेश करते.
चीनमध्ये थ्री गॉर्जेस धरण हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर बांधले आहे. जे जलविद्युत गुरुत्वाकर्षण धरण आहे. आधीपासून असलेल्या जगातील या सर्वात मोठ्या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी झाला आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या शास्त्रज्ञांनी २००५ मध्ये या थ्री गॉर्जेस धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी झाल्याचा हा अंदाज लावला होता.या धरणात ४२ अब्ज टन पाणीसाठा आहे. यामुळे पृथ्वी फिरताना गती गमावते असे त्यांनी म्हटले होते.