मध्य आशियाई देश येमेनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जेथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य महासंचालक (डीजी) टेड्रोस अधानोम बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येमेनमधील साना आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी हा हल्ला करण्यात आला आहे.हा हवाई हल्ला एवढा भीषण होता की 2 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
साना विमानतळावर हा हवाई हल्ला इस्रायलने केला आहे. अहवालानुसार, (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम यांची संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांसह फ्लाइटमध्ये जात असताना हा बॉम्बस्फोट करण्यात आला आहे.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी यानंतर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “यूएन कर्मचारी बंदिवानांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्याचे आणि येमेनमधील आरोग्य आणि मानवतावादी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याचे आमचे ध्येय आज संपले. आम्ही बंदिवानांच्या तात्काळ सुटकेसाठी प्रयत्न सुरू ठेवू. सुमारे दोन तासांपूर्वी, जेव्हा आम्ही सना येथून उड्डाण घेणार होतो तेव्हाच हा स्फोट झाला आहे.
ते पुढे म्हणाले, “विमानतळावर किमान दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. जाण्यापूर्वी विमानतळाचे नुकसान दुरुस्त होईपर्यंत आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. मी, माझे UN आणि WHO सहकारी सुरक्षित आहोत. मात्र ज्या कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले त्या कुटुंबांसाठी नेहमीच आमच्या मनात आदर असेल. तसेच या हल्ल्यात ज्यांच्या प्रियजनांना प्राण गमवावे लागले त्यांच्याबद्दल संवेदना.”
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की नागरिक आणि मानवतावादी कामगारांना कधीही लक्ष्य केले जाऊ नये. येमेनमधील साना आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेड सी पोर्ट आणि पॉवर स्टेशनवर झालेल्या हल्ल्यांना धोकादायक असल्याचे सांगत त्यांनी खेदही व्यक्त केला आहे .
या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले असून किमान ३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी सांगितले. त्यांनी सर्व पक्षांना लष्करी कारवाई थांबवून संयम बाळगण्यास सांगितले आहे.