गोंदियात देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम नामक जहाल नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले आहे. तो छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गुंडम सुटबाईपारा, पोस्ट- बासागुडा, तहसील- ऊसुर, पो. स्टे. पामेड येथील रहिवासी असून त्याच्यावर 7 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तो तांडा दलम, मलाजखंड दलम, पामेड प्लाटून- ९चा समितीचा सदस्य आहे. देवा मुडाम याने काल शुक्रवारी जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले आहे.
गोंदिया जिल्हा पोलीसांच्या आत्मसमर्पण संबंधी केलेल्या आवाहनाला प्रभावित होवून आणि माओवादी संघटनेत होणारा त्रास व अत्याचारास कंटाळून देवा सुमडो मुडाम याने आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित माओवादी देवा अति नक्षल प्रभावित भागात असल्याने त्याचे गावात पुर्वी पासुनच सशस्त्र गणवेषधारी नक्षलवाद्यांचा वावर होता. माओवाद्यांच्या भुलथापा व प्रलोभनांना बळी पडुन त्यांच्या निर्देशाप्रमाणे लहानपणापासुनच तो नक्षल चळवळीत सहभागी होवुन बाल संघटनमध्ये काम करीत होता. त्यानंतर सन- 2014 मध्ये तो पामेड दलम (दक्षीण बस्तर), जि. बिजापुर मध्ये भरती झाला व त्याने शस्त्र हातात घेतले. पामेड दलम मध्ये 6 महिने काम केल्यानंतर सन- 2014 चे अखेरीस त्याने अबुझमाड एरीया मध्ये अडीच महिन्याचे प्रशिक्षण घेतले, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यास सन 2015 मध्ये माओवाद्यांचे बस्तर एरीया मधुन एम. एस. सी. (महाराष्ट्र- मध्यप्रदेश -छत्तीसगड) झोन कडे पाठविण्यात आले. एम.एम.सी. मध्ये येवून सुरुवातीला त्याने दलम सदस्य म्हणून सन 2015 ते 2016 पर्यंत तांडा दलम व सन 2016 ते 2017 पर्यंत मलाजखंड दलम मध्ये काम केले आहे.
देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबविली जात आहे.