दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११.४५ वाजता निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याचा दाखला देत केंद्रीय गृह मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाला संपूर्ण लष्करी सन्मानाने त्यांच्या शासकीय इतमामाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार,डॉ. मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस भवनाच्या दिशेनं रवाना झाले आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांसह सामान्य नागरीक या ठिकाणी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत.
दुसरीकडे, डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी निगमबोध घाटावर व्यवस्था करण्यात येत असल्याबाबत गृहमंत्रालयाच्या या पत्रानंतर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत स्वतंत्र जागा देण्यावरही चर्चा झाली. त्यानंतर राज्यसभा सदस्य रणदीप सुरजेवाला यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे राजधानी दिल्लीत त्यांच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ स्मारक स्थळ बांधणे ही भारतमातेच्या महान सुपुत्राला खरी श्रद्धांजली ठरेल. राजकीय विचारसरणीची पर्वा न करता मोदी सरकारने काँग्रेस अध्यक्षांची ही विनंती मान्य करून अंत्यसंस्कार करण्याचा आणि स्मृतीस्थळावरच स्मारक बांधण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. काँग्रेस अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या कोट्यवधी देशवासीयांच्या भावनांनुसार निर्णय घेतला जाईल, अशी आशा आहे.
काँग्रेस नेत्या अलका लांबा म्हणाल्या, सरदार मनमोहन सिंग यांच्यावर निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करणे कितपत योग्य आहे? त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची पाहता ही जागा अजिबात योग्य नाही. असे करणे त्यांच्या सन्मानाच्या विरुद्ध असेल. यापूर्वी कोणत्याही माजी पंतप्रधानांसोबत असे घडले नव्हते. माजी पंतप्रधान अटलजी हे याचे ताजे उदाहरण आहे, ज्यांचे अंतिम संस्कार आणि स्मारक योग्य ठिकाणी बांधण्यात यायला हवे. केंद्र सरकारचा हा निर्णय दुर्दैवी आणि दुखावणारा आहे. काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांनीही अशाच प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.