मणिपूरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. मणिपूरच्या इम्फाल पूर्व जिल्ह्यातील 2 गावांवर डोंगराळ भागातील सशस्त्र लोकांनी काल, शुक्रवारी बंदुका आणि बॉम्बने हल्ला केला आहे .त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे.कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे.
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व आणि कांगपोकली जिल्ह्यात गोळीबार सुरू आहे. अनेक भागात 24 डिसेंबरपासून सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनेने शुक्रवारी मोठे वळण घेतले. यिंगंगपोकपी, थमनापोकपी, थंबापोकपी, सबुंगखोक खुनौ, शांती खोंगबल आणि इतर भागात दहशतीचे वातावरण आहे.
यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे हल्ले सानसाबी आणि थमनापोकपी गावात झाले. मात्र, या हल्ल्यांमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र हल्ल्यांना सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देताच परिणामी दोन्ही गावांमध्ये भीषण गोळीबार झाला. पहाडी भागातील सशस्त्र लोकांनी सकाळी 10.45 च्या सुमारास सानसाबी गाव आणि आसपासच्या भागात अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांना सुरक्षादलांनी प्रत्युत्तर दिले.
जेव्हा सशस्त्र लोक आणि सुरक्षा जवानांमध्ये गोळीबार सुरू झाला तेव्हा स्थानिक लोक इकडे-तिकडे पळत सुटले होते. सशस्त्र हल्लेखोरानी सकाळी 11.30 वाजता जिल्ह्यातील थमनापोकपी गावातही हल्ला केला, त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. यावेळी सीआरपीएफच्या जवानांसह सुरक्षा दलांनी गोळीबारात अडकलेल्या अनेक महिला, मुले आणि वृद्धांची सुटका केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. .
मणिपूरमध्ये जातीय हिंसाचाराला 600 दिवस हून अधिक दिवस उलटले आहेत. या दरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन्ही समुदायातील 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर 60 हजार लोक आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. आतापर्यंत 11 हजार एफआयआर नोंदवण्यात आले असून 500 जणांना अटक करण्यात आली आहे. मे 2023 पासून मणिपूरमधील कुकी-मैतेई यांच्यात हिंसाचार सुरू आहे.