जेष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकुर यांचे आज सकाळी वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. नर्मदालयाच्या संस्थापक भारतीताई ठाकूर या त्यांच्या भगिनी होत. गेल्या आठवडाभरापासून डॉ. ठाकूर आजारी होते. थकवा जाणवत असल्याने त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. ठाकूर यांनी तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केली. त्यांनी पुणे डेली या दैनिकात उपसंपादक म्हणून तर युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, द इंडियन पोस्ट आणि द ऑब्जर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्सचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. पत्रकार प्रतिष्ठानच्या स्थापनेत आणि पत्रकार भवनाच्या इमारतीच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. तसेच पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त व कार्यवाह तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. ते पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्षही होते.
डॉ. ठाकूर यांनी २००१ मध्ये अध्यापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. २००१ ते २००७ या काळात विभागाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आणि नव्या संशोधनांना चालना दिली. डॉ. ठाकूर यांनी भारतातील वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या या विषयावर पीएचडी संशोधन केले. अनेक शोधनिबंधांबरोबरच न्यूजपेपर इंग्लिश, हँडबुक ऑन प्रिंट जर्नालिझम आदी पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.
विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी अहमदाबाद येथील मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड रिसर्च, तसेच फ्लेम आणि विश्वकर्मा विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक म्हणून काम पाहिले. भारतीय विद्याभवनच्या नानासाहेब परुळेकर पत्रकारिता विभागाचे कामही त्यांनी काही काळ केले.