पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि त्यांना “उत्कृष्ट दूरदृष्टीचे राज्यकर्ते” असे संबोधले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंध वाढवण्यात कार्टर यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे.
आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हंटले आहेत की, “अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. ते महान दूरदृष्टीचे राजकारणी होते. ज्यांनी जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिकेचे मजबूत संबंध वाढवण्यात त्यांचे योगदान आहे. त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि अमेरिकेतील लोकांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.”
Deeply saddened by the passing of former USA President Mr. Jimmy Carter. A statesman of great vision, he worked tirelessly for global peace and harmony. His contributions to fostering strong India-U.S. ties leave a lasting legacy. My heartfelt condolences to his family, friends…
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2024
अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे रविवारी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. ते अमेरिकेचे सर्वाधिक काळ जगणारे राष्ट्राध्यक्ष ठरले. जिमी कार्टर हे गरीब आणि वंचितांची सेवा करणारे आणि त्यांच्या हक्कांचे समर्थन करणारे मानवतावादी नेते म्हणून ओळखले जात होते.
जिमी कार्टर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२४ रोजी झाला. त्यांनी 1977 ते 1981 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. वयाची शंभरी गाठणारे ते एकमेव माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते. 1978 मध्ये, अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून, कार्टर यांना कॅम्प डेव्हिड करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल स्मरणात ठेवले जाते, ज्यामुळे 1967 च्या सहा दिवसांच्या युद्धात ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून इस्त्रायलीने प्रथम महत्त्वपूर्ण माघार घेतली आणि इस्त्रायल आणि इजिप्त यांच्यात शांतता करार झाला.
कार्टर यांच्या योगदानामुळे त्यांना 2002 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत केवळ चार राष्ट्राध्यक्षांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ते काही वादांमध्ये अडकले होते, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा पनामा कालव्याचा विषय ठरला होता.
1978 मध्ये जिमी कार्टर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून भारताचा दौरा केला होता. त्यांनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी आणि तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांची भेट घेतली होती . या भेटीदरम्यान त्यांनी भारतीय संसदेलाही संबोधित केले होते.