मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरील हक्क सोडल्यास प्रत्येक मशिदीखाली शिवलिंगाचा शोध घेणे थांबवणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ.सुरेंद्र कुमार जैन यांनी म्हटले आहे.ते म्हणाले आहेत की, शांतताप्रिय हिंदू समाज 1984 पासून काशी आणि मथुरेवर दावा करत आहे. त्या वेळीही आम्ही मुस्लिमांना असा प्रस्ताव दिला होता की त्यांनी या दोन जागांवर आपला हक्क सोडल्यास हिंदू समाज इतर जागेवर दावा करणार नाही. मात्र मुस्लिम समाजाने आपली कट्टरता सोडली नाही आणि ही संधी गमावली, अशी खंत जैन यांनी व्यक्त केली आहेत.आताही मुस्लिमांनी या प्रस्तावावर विचार करावा अन्यथा या खटल्यांचा निकाल देण्यासाठी न्यायालये आहेतच.असे ते म्हणाले आहेत.
विश्व हिंदू परिषदेने आपला कोणताही विषय सोडलेला नाही, असे डॉ.जैन यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘तेथे मंदिर बांधू, मंदिर भव्य करू’ या वचनाप्रमाणे अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, आता कृष्णजन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिर मुक्त करण्याचा आमचा ध्यास आहे असे ते म्हणाले आहेत.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ‘प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधू नका’ असे आवाहन केलेल्या विधानाशी डॉ. जैन यांनीही सहमती दर्शवली. मात्र यावर आपले मत मांडताना डॉ.जैन म्हणाले की, सरसंघचालकांच्या विधानाशी आपण पूर्णपणे सहमत आहोत, मात्र त्यांच्या विधानातील एकच वाक्य मुद्दाम पुढे आणून चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. मुस्लिम समाजाने धर्मांधता सोडली पाहिजे असेही सरसंघचालक म्हणाले आहेत. याकडे जैन यांनी लक्ष वेधले.
पुढे जैन यांनी असेही म्हटले आहे की, मुस्लिमांच्या कट्टरतेमुळे आज हिंदू समाजावर मशिदीखाली मंदिर शोधायची वेळ आली आहे. काशी आणि मथुरेची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. या खटल्याच्या निकालाची मुस्लिम समाजाने संयमाने वाट पहावी, असे जैन यांनी सुचवले आहे. मथुरेच्या इदगाह प्रकरणी न्यायालयाने 1947 पूर्वीचा निकाल दिला आहे.असे म्हणत काशी आणि मथुरेत मंदिरे होती, मंदिरे आहेत आणि मंदिरेच असतील.असे जैन यांनी ठाम विधान केले आहे. आता प्रकरणे न्यायालयात आहेत. तरीही मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरील हक्क सोडल्यास आम्ही मशिदीखाली शिवलिंग शोधणे बंद करू.असा इशारा त्यांनी मुस्लिमांना दिला आहे.