नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमत कमी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांना चांगलाच फायदा होणार आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. आज म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडर 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी 1 मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप त्यामध्ये कपात करण्यात आलेली नाही.
या निर्णयानुसार 1 जानेवारी 2025 पासून दिल्लीमध्ये 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडर 1804 रुपयांना, तर मुंबईत 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1966 रुपये तर कोलकाता शहरात 1911 रुपयांना मिळणार आहे. . याआधी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर दिल्लीमध्ये 1818.50 रुपये होता.तो आता 1804 झाला आहे.
व्यावसायिक सिलेंडरच्या दरात झालेल्या या कपातीनंतर सर्वसामान्यांना हॉटेलच्या जेवणाच्या बिलात तर सवलत मिळेलच तसेच ऑनलाईन ऑर्डर करूनही दिलासा मिळू शकेल.
गॅस सिलेंडरबरोबरच एअरलाइन्सवरदेखील नवीन वर्षात इंधनाच्या किंमतीत कपात झाली आहे. OMCs ने जानेवारीपासून हवाई ईंधनाच्या किंमतीत कपात केली आहे. यामुळं विमानाच्या तिकिटांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विमान इंधनाच्या एटीएफ किमतींमध्ये प्रति लिटर 11401.37 रुपयांचा दिलासा मिळाला होता.