राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे आज, बुधवारी पहाटे निधन झाले.हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रदीप नाईक यांची प्राणज्योत मालवली. ते ६९ वर्षांचे होते. आज, बुधवार हैदराबाद येथे ही घटना घडली आहे. दरम्यान नाईक यांच्या निधनाने राजकीय वर्तुळासह किनवट आणि माहूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता किनवट येथील त्यांच्या गावी दहेली तांडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता.पराभवाचा त्यांना चांगलाच धक्का बसला होता.
प्रदीप नाईक हे सलग तीन टर्म आमदार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदीप नाईक प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. नाईक हे मातब्बर नेता म्हणून ओळखले जायायचे. मागील २५ वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षात एकनिष्ठ असून शरद पवार यांचे विश्वासू होते. २००४, २००९ आणि २०१४ असे तीन टर्म ते किनवट मतदारसंघाचे आमदार होते. बंजारा समाजाचे नेते देखील होते. दरम्यान राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यात शरद पवारांची राष्ट्रवादी बॅकफूटवर आली.यावेळी अनेक नेते अजित पवार यांच्या सोबत गेले. पण अश्या परिस्थितीतही ते शरद पवारांसोबत खंबीरपणे उभे राहिले.