दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या भ्रष्टाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.आप सरकारचा ‘आप-दा’ म्हणजे संकट असा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की.गेल्या 10 वर्षांपासून या राष्ट्रीय राजधानीला आपत्तीने घेरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील विविध प्रकल्पांना संबोधित करताना आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना फटकारले आहे .अशोक विहारमधील झोपडपट्टी रहिवाशांसाठी बांधण्यात आलेल्या स्वाभिमान अपार्टमेंटमधील 1,675 सदनिकांच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द केल्यानंतर रामलीला मैदानावर पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करत होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी रिमोटचे बटण दाबून राष्ट्रीय राजधानीतील रहिवाशांना 4500 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प भेट दिले. जे जेजे क्लस्टरमधील रहिवाशांसाठी 1,675 फ्लॅट्स, शाळा आणि महाविद्यालयांशी संबंधित प्रकल्प आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, मोदींनी स्वत:साठी कधीही घर बांधले नाही हे देशाला चांगलेच ठाऊक आहे. मीही स्वतःसाठी शीशमहाल बांधू शकलो असतो, पण गेल्या 10 वर्षांत मी 4 कोटींहून अधिक लोकांना घरे देऊन त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. झोपडपट्ट्यांच्या बदल्यात त्यांना फ्लॅट मिळाले . हे स्वाभिमान अपार्टमेंट गरीबांचा स्वाभिमान वाढवणार आहे. झोपडपट्ट्यांच्या बदल्यात ज्यांना फ्लॅट मिळाले ते दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणचे असले तरी ते सर्व आपले कुटुंब असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा अप्रत्यक्ष समाचार घेत पंतप्रधान म्हणाले की,अण्णा हजारे यांना आघाडीवर ठेवून काही ‘कट्टर बेईमान’ लोकांनी देशाची राजधानी ‘आपत्ती’कडे ढकलली आहे. ते म्हणाले की, आम आदमी पार्टी दिल्लीत ‘आप-दा’सारखी आली आहे. हे लोक उघडपणे भ्रष्टाचार करतात आणि त्याचा आनंदही साजरा करतात. दिल्लीवर ‘आपत्ती’चे संकट आले असले तरी आता जनता जागी झाली आहे. ‘आम्ही आपत्ती सहन करणार नाही, ती बदलू’, असे दिल्ली आता एका आवाजात सांगत आहे. पुढे पंतप्रधान म्हणाले आहेत की, गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीला एका मोठ्या आपत्तीने घेरले आहे. अण्णा हजारे यांना पुढे करून काही कट्टर अप्रामाणिक लोकांनी दिल्लीला आप-दा मध्ये ढकलले आहे. असे म्हणत पंतप्रधानांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे.
दिल्लीच्या मतदारांनी दिल्लीला या आपत्तीतून मुक्त करण्याचा निर्धार केल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, दारूच्या दुकानात घोटाळा, मुलांच्या शाळांमध्ये घोटाळा, गरिबांच्या उपचारात घोटाळा, नोकरभरतीच्या नावावर घोटाळा, हे लोक दिल्लीच्या विकासाच्या गप्पा मारायचे, पण या लोकांनी प्रत्यक्षात ‘आप-दा’ बनून दिल्लीवर हल्ला चढवला आहे. मात्र आता दिल्लीतील जनतेने आप-दाविरोधात युद्ध सुरू केले आहे. दिल्लीच्या मतदारांनी दिल्लीला आपदा पासून मुक्त करण्याचा निर्धार केला आहे.
पंतप्रधान म्हणाले की, आज भारत राजकीय आणि आर्थिक स्थिरतेचे प्रतीक बनला आहे. भारताची ही भूमिका 2025 मध्ये आणखी मजबूत होईल.हे वर्ष जगामध्ये भारताचे स्थान आणखी मजबूत करण्याचे वर्ष असेल. हे वर्ष भारताला जगातील सर्वात मोठ्या उत्पादन केंद्रांपैकी एक बनवण्याचे वर्ष असेल.असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते म्हणाले की, विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने काम करत आहे. प्रत्येक नागरिकाला कायमस्वरूपी घर मिळाले पाहिजे हा आमचा संकल्प असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत. हे उद्दिष्ट साध्य करण्यात दिल्लीचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यामुळेच भाजपच्या केंद्र सरकारने झोपडपट्ट्यांच्या जागी कायमस्वरूपी घरे बांधण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
यमुनेच्या स्वच्छतेबाबतही पंतप्रधानांनी केजरीवाल सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, यमुनेच्या स्वच्छतेअभावी दिल्लीकरांना घाण पाणी मिळत आहे. जनतेला टँकर माफियांच्या ताब्यात दिले आहे. दिल्लीतील लोकांना मोफत उपचार सुविधा देणाऱ्या ‘आयुष्मान भारत’ योजनेचा लाभ त्यांना मिळवून द्यायचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले आहेत. . आप-दा सरकारचे दिल्लीतील जनतेशी मोठे वैर आहे. आयुष्मान योजना संपूर्ण देशात लागू आहे, परंतु आपचे लोक ही योजना येथे (दिल्ली) लागू होऊ देत नाहीत. याचा फटका दिल्लीतील जनतेला सहन करावा लागत आहे.दिल्लीतील जनतेने या आपत्तीविरुद्ध लढा सुरू केला आहे, असे सांगून त्यांनी आपच्या राजवटीत दिल्लीतील विविध घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर प्रकाश टाकला.