दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने या यादीत एकूण 29 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपने प्रवेश शर्मा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.तर नुकतेच आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये दाखल झालेले कैलाश गेहलोत यांना बिजवासन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कालकाजी मतदारसंघातून भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांना तिकीट दिले आहे.
मनजिंदर सिंग सिरसा यांना राजौरी गार्डनमधून उमेदवारी देण्यात आली आहे. रवी नेगी यांना पक्षाने पटपडगंजमधून तिकीट दिले आहे. रिठाळामधून कुलवंत राणा, पटेल नगरमधून राजकुमार आनंद, करोल बाग मतदारसंघातून दुष्यंत गौतम, शालिमार बागेतून रेखा गुप्ता, आदर्श नगर मतदारसंघातून राजकुमार भाटिया, मंगोलपुरी मतदारसंघातून राजकुमार चौहान, जनकपुरी मतदारसंघातून आशिष सूद, रोहिणी मतदारसंघातून विजेंद्र गुप्ता, मॉडेल टाऊन मतदारसंघातून अशोक गोयल यांना तिकीट दिले आहे.
तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक साधण्यासाठी ‘आप’ने प्रथमच निवडणूक रणधुमाळीत उतरून पूर्ण तयारी केली आहे. तर दिल्लीतील निवडणुका जिंकून भाजपला आपली स्थिती सुधारायची आहे. तसेच 2015 आणि 2020 मध्ये ‘आप’कडून पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसला दिल्लीच्या राजकारणात पुन्हा आपले पाय रोवायचे आहेत.
इतर पक्षांविरुद्ध बंडखोरी करून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांनाही भाजप पक्ष हायकमांडने संधी दिली आहे. यामध्ये करतार सिंग तंवर, राजकुमार चौहान, कैलाश गेहलोत आणि अरविंदर सिंग लवली यांचा समावेश आहे.
भाजपने 29 जागांवर ज्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यापैकी दोन महिला आहेत. रेखा गुप्ता यांना शालीमार बागमधून उमेदवारी देण्यात आली असून सीमापुरी अनुसूचित जाती मतदारसंघातून कुमारी रिंकू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.