पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये शनिवारी (४ जानेवारी २०२५) संध्याकाळी चालत्या बसमध्ये मोठा स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या आत्मघाती हल्ल्यात एक प्रवासी वाहन आणि पोलीस वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यामध्ये जवान मोठ्या संख्येने आहेत.
या हल्ल्याने भारतात झालेल्या २०१९ च्या पुलवामा हल्ल्याची आठवण करून दिली आहे. जो पाकिस्तानने घडवून आणला होता. ज्यामध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यातील जवानांच्या बसला स्फोटकांनी भरलेल्या कारने धडक दिली होती.या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले होते. तर 38 जवान जखमी झाले होते.
पाकिस्तानातील वृत्तपत्र द डॉननुसार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तान पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी राबिया तारिक यांनी सांगितले की माहितीनुसार बस कराची येथून तुर्बतकडे निघाली होती. न्यू बहमन भागात या बसला टार्गेट करण्यात आले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.
बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी म्हटले, की या हल्ल्यात एसएसपी मोहसिन आणि त्यांच्या कुटुंबातील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे . ते म्हणाले आहेत की, “जे निष्पाप लोकांना टार्गेट करतात ते माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत.” या दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत आणि जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो, असेही त्यांनी नमूद केले आहे.