2 जानेवारीच्या संध्याकाळपासून पाटणाच्या गांधी मैदानावर आमरण उपोषण करत असलेले जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर आणि इतर काही जणांना बिहार पोलिसांनी आज पहाटे 4 वाजता अटक केली आहे. त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप समर्थकांनी केला असून त्यांना पोलिसांनी थप्पड मारल्याचा दावा पक्षाने केला आहे.
कोलमडलेली शिक्षण व्यवस्था आणि परीक्षांमधील भ्रष्टाचाराविरोधात किशोर हे आमरण उपोषण करत असल्याचे जन सूरज पार्टीने म्हटले आहे. दरम्यान प्रशांत यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. तसेच आपले उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांनी रस्त्यावरच गोंधळ घातला. या गोंधळाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसून आला.
प्रशांत किशोर यांना आज पहाटे ३.४५ वाजता त्याच्या काही समर्थकांसह अटक करण्यात आल्याचे पाटणा जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. त्यांच्यातील प्रत्येकजण पूर्णपणे निरोगी आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना न्यायालयासमोर सादर करण्याची औपचारिकता पूर्ण केली जात आहे. प्रशांत किशोर आणि इतर काही लोक पाच कलमी मागण्या घेऊन प्रतिबंधित क्षेत्र गांधी मैदानातील गांधी पुतळ्यासमोर बेकायदेशीरपणे आंदोलन करत असल्याचे प्रशासनाने सांगितले. प्रशासनाने त्यांना तेथून हटत गार्डनीबागेत जाण्याची नोटीस दिली होती, याप्रकरणी गांधी मैदान पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. वारंवार विनंती करून आणि पुरेसा वेळ देऊनही, प्रतिबंधित क्षेत्र रिकामे करण्यात आले नाही. त्यामुळे आज सकाळी त्यांना काही समर्थकांसह अटक करण्यात आली आहे.
प्रशांत किशोर यांच्या मागण्यांमध्ये BPSC च्या 70वी प्राथमिक परीक्षेतील गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी आणि फेरपरीक्षेचा समावेश आहे. सन 2015 मध्ये सात ठरावांतर्गत दिलेल्या आश्वासनानुसार 18 ते 35 वर्षे वयोगटातील बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा. गेल्या 10 वर्षांतील स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटीची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अश्या मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाला सुरवात केली होती.