अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम देत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी रात्री पंतप्रधानपदाचा आणि सत्ताधारी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. राष्ट्राला संबोधित करताना ट्रूडो म्हणाले की , “मी या पदावर काम केल्याबद्दल कृतज्ञ आहे. “मात्र मी पुढच्या निवडणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय नाही”.
कॅनडाच्या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जोपर्यंत ट्रुडो यांचा उत्तराधिकारी निवडला जात नाही तोपर्यंत तेच पंतप्रधानपदावर राहतील. ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर नियोजित वेळेपूर्वी निवडणुका घेण्याची मागणी होऊ शकते, असे मानले जात आहे.
कॅनेडियन लोकांना संबोधित करताना, 53 वर्षीय ट्रूडो म्हणाले की, “मी सर्वोतोपरी प्रयत्न करूनही एक महिना संसद ठप्प झाली होती, परंतु मी माझ्या देशाच्या भल्यासाठी लढत आहे. हा लढा यापुढेही सुरूच राहील.” ते म्हणाले की लिबरल पक्षात अंतर्गत लढाई होती, ज्यामुळे त्यांनी पक्षप्रमुख आणि कॅनडाचे पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, .
जस्टिन ट्रूडो म्हणाले, “मी गव्हर्नर जनरलला सल्ला दिला की आम्हाला संसदेचे नवीन अधिवेशन हवे आहे. माझी विनंती मान्य करण्यात आली असून सभागृह २४ मार्चपर्यंत तहकूब केले जाईल.
आपल्या पदावरून पायउतार होण्यासाठी दबाव वाढल्यानंतर जस्टिन ट्रुडो यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ट्रुडो यांना विविध मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला होता. , ज्यात अन्न आणि घरांच्या गगनाला भिडलेल्या किमतीं, तसेच निज्जरची हत्या आणि त्यांनी केलेले भारतावर बिनबुडाचे आरोप अश्या प्रकरणांचा मुख्यत्वे समावेश आहे.
द ग्लोब अँड मेल या वृत्तपत्राच्या वृत्तात जस्टिन ट्रूडो आजच आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. नॅशनल लिबरल पार्टीच्या संसदीय पक्षाची बैठक ८ जानेवारीला होणार आहे. याआधीही ट्रुडो राजीनामा देतील अशी अटकळ बांधली जात होती. द ग्लोब अँड मेल या वृत्तपत्रानुसार, सत्ताधारी लिबरल पक्षात ट्रुडो यांच्याविरोधात असंतोष वाढत चालला आहे. पक्षाचे खासदार उघडपणे ट्रुडो यांच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत. पुढची निवडणूक ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली लढली तर पराभव निश्चित आहे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळेच पक्षाच्या सदस्यांच्या दबावामुळे ट्रुडो यांनी हे पाऊल उचलले आहे.
यावेळी ट्रुडो यांना पुढे करून निवडणूक जिंकणे फार कठीण असल्याचेही लिबरल पक्षाचे सदस्य मानतात. या सदस्यांनी ट्रुडो यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम देखील सुरू केली होती. आता अखेर ट्रुडो यांनी राजीनामा दिला आहे.