महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शाळेचे प्रमाण वाढते आहे. इंग्रजी शाळांमधून मराठी शिकवण्याची टाळाटाळ केली जात आहे. तसेच नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चा असताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे, असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर दादा भुसे यांनी शालेय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. दादा भुसे हे आता ॲक्शनमोडमध्ये आले असून राज्यातील सर्व शाळांमध्ये आता मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. दादा भुसे म्हणाले की, “शालेय शिक्षण विकासाचा एक दशसूत्री कार्यक्रम जाहीर करून तो राबवला जाईल. इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी राज्यात मराठी भाषा महत्त्वाची आहे.आता या भाषेला केंद्राकडून अभिजात ही दर्जा मिळाला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक आहे. मात्र तरी काही शाळा यातून पळवाट काढत आहेत. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. आता राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचा कायदा करण्यात आला आहे. यामुळे खासगी, सीबीएससी, आयसीएससी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू असणार आहे. त्यानुसार मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे”, अशा सूचना दादा भुसे यांनी केल्या आहेत.
पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले आहेत की ,“तसेच मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर शालेय शिक्षण विभागाची करडी नजर असणार आहे. ज्या शाळा मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करत असतील, त्याची तक्रार पालकांना करता येणार आहे. तसेच या अशा शाळांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे”, असा सूचक इशारा देखील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे.