उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी महाकुंभ उत्सवादरम्यान प्रयागराजमध्ये ‘कुंभवाणी’ या रेडिओ चॅनेलचे उद्घाटन केले, जे ऑल इंडिया रेडिओच्या आकाशवाणीचा भाग असणार आहे
या कार्यक्रमात बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, सनातन धर्माबद्दल “संकुचित” दृष्टिकोन असलेले आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जातो असा दावा करणाऱ्यांनी महाकुंभमेळा पाहावा जिथे सर्व स्तरातील लोक एकत्र येत पवित्र संगमात स्नान करतात.
“महाकुंभ हा केवळ एक (साधा) कार्यक्रम नाही. तो सनातन अभिमानाचे प्रतिनिधित्व करतो, एक असा महामेळावा जिथे सनातन धर्माचे वैभव पाहणाऱ्या कोणालाही येता येईल. जे सनातन धर्माला संकुचित दृष्टीने पाहतात आणि भेदभाव कायम आहे असे सांगून लोकांना विभाजित करतात त्यांनी येऊन कुंभमेळ्यात सहभाग घ्यावा. जिथे जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव नाही. अस्पृश्यतेची प्रथा नाही. लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव नाही. सर्वजण संगमात स्नान करण्यासाठी एकत्र येतात,” असे आदित्यनाथ यांनी कार्यक्रमातील अधिकारी आणि मान्यवरांना संबोधित करताना सांगितले आहे. .
उद्घाटन कार्यक्रमात त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि इतर कॅबिनेट मंत्री होते. महाकुंभाच्या निमित्ताने प्रसार भारती यांनी ‘कुंभवाणी’ सुरू केली आहे.
महाकुंभासाठी समर्पित रेडिओ चॅनेल सुरू करण्यासाठी प्रसार भारतीने केलेल्या प्रयत्नांचे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आणि बदलत्या काळाच्या असूनही आव्हानांवर मात केली आहे असे सांगितले.
“आकाशवाणी हे एकमेव माध्यम होते जे आम्हाला सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना लोकसंस्कृती आणि परंपरा प्रदान करण्यासाठी होते. मला आठवते की, बालपणात आम्ही आकाशवाणीने प्रसारित केलेल्या रामचरितमानसातील ओळी ऐकायचो. काळानुसार परिस्थिती बदलली आणि लोक दृश्य माध्यमांकडे वळले.पण प्रसार भारती या आव्हानांना न जुमानता, विशेषतः ज्या भागात कनेक्टिव्हिटी समस्या आहेत अशा ठिकाणी टिकून राहण्यात यशस्वी झाले,” असे आदित्यनाथ म्हणाले आहेत.
त्यापूर्वी, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गुरुवारी प्रयागराज येथे महाकुंभ २०२५ साठी मीडिया सेंटरचे उद्घाटन केले आणि आगामी भव्य कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शहराला भेट दिली. विविध धार्मिक नेत्यांशी झालेल्या भेटी आणि तयारीचा आढावा त्यांनी घेतला आहे.
१२ वर्षांनंतर महाकुंभ साजरा होत आहे आणि या कार्यक्रमासाठी ४५ कोटींहून अधिक भाविक उपस्थिती लावतील असे सांगितले जात आहे.महाकुंभादरम्यान, पवित्र स्नान करण्यासाठी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर भाविक जमतील. महाकुंभ २६ फेब्रुवारी रोजी संपणार आहे.कुंभातील मुख्य स्नान विधी (शाही स्नान) १४ जानेवारी (मकर संक्रांती), २९ जानेवारी (मौनी अमावस्या) आणि ३ फेब्रुवारी (बसंत पंचमी) रोजी होतील