तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) दहशतवादी गट आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील चिघळलेल्या संघर्षाने आता नवे वळण घेतले आहे.
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने अणुऊर्जा आयोगाच्या १६ कर्मचाऱ्यांचे अपहरण केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत की पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या टीटीपी कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांची सुटका केली जाईल. पाकिस्तानच्या हिंसाचारग्रस्त खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अस्थिर प्रदेश असलेल्या लक्की मारवत भागात अणुऊर्जा आयोगाच्या काही खाण प्रकल्पांसाठी काम करत असताना कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
लक्की मारवतमधील काबुल खेल अणुऊर्जा खाण प्रकल्पात हे अपहरण झाले आहे. कर्मचारी वापरत असलेल्या गाड्या टीटीपीच्या दहशतवाद्यांनी पेटवून दिल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने असे नमूद केले आहे की यांच्यामध्ये काही कामगार आहेत तर काही अणुऊर्जा आयोगाचे कर्मचारी आहेत.
पाकिस्तान सरकारने असा दावा केला आहे की त्यांनी अपहरण केलेल्यांपैकी ८ जणांची ‘सुटका’ करण्यात यश मिळवले आहे. तथापि, टीटीपीने हे दावे फेटाळून लावले आहेत. टीटीपीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये, कर्मचारी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना त्यांच्या अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करण्याची आणि त्यांचे जीव वाचवण्याची विनंती करताना दिसत आहेत. लक्की मारवत परिसर अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशात आहे आणि टीटीपी कारवायांचे केंद्रस्थान आहे. या प्रदेशात पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अपहरण आणि हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी पोलिस स्टेशनची तोडफोड केल्यानंतर, बँक लुटल्यानंतर आणि सरकारी कार्यालय ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी टीटीपीकडून ही अपहरणाची घटना घडली आहे.