अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारत सरकारलाही निमंत्रण मिळाले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे भारताचे प्रतिनिधी म्हणून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे.
२० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगातील अनेक देशांतील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण भारत सरकारलाही मिळाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प-व्हान्स उद्घाटन समितीच्या निमंत्रणावरून, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या भेटीदरम्यान जयशंकर नवीन अमेरिकन प्रशासनातील सदस्यांना तसेच शपथविधी सोहळ्यासाठी अमेरिकेत असलेल्या इतर महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत.या शपथविधी सोहळ्यामुळे जागतिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे, आणि भारत-अमेरिका संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने जयशंकर यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
२० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.यावेळी त्यांच्या सरकारमध्ये भारतीय वंशाचे अनेक चेहरे समाविष्ट आहेत. ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल, ज्यामध्ये शपथविधी, परेड आणि औपचारिक कार्यक्रमांचा समावेश असेल. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स ट्रम्प यांना शपथ देणार आहेत. 21व्या शतकात पहिल्यांदाच सुट्टीच्या दिवशी अमेरिकेच्या अध्यक्षांचा शपथविधी होत आहे. उपाध्यक्ष जेडी वेंस यांनाही या दिवशी शपथ देण्यात येणार आहे. शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकन संसदेच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
6 जानेवारी रोजी अमेरिकी संसदेने इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीनंतर ट्रम्प यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.निवडणुकीचे मतदान 5 नोव्हेंबर 2024 रोजी झाले होते, परंतु अधिकृत घोषणा दोन महिन्यांनंतर करण्यात आली होती.