भारत आणि चीन यांच्या दरम्यान पूर्व लद्दाखसह असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) स्थिती संवेदनशील असली तरी स्थिर असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली आहे.
यासंदर्भात जनरल द्विवेदी म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये पूर्व लडाखमधील देपसांग आणि देमचोकमधील परिस्थिती निवळली. या दोन्ही ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पूर्व लडाखमधील परिस्थिती संवेदनशील असली तरी स्थिर आहे. एलएसीवरील सैन्य तैनाती समतोल आणि मजबूत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत. उत्तरेकडील सीमांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे युद्ध प्रणालीमध्ये विशिष्ट तंत्रज्ञानाचा समावेश शक्य झाला आहे. चीनकडून 2020 मध्ये झालेल्या घुसखोरीच्या प्रयत्नामुळे भारत-चीन सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. गलवान खोऱ्यातही भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. यात 20 भारतीय सैनिकांना हौतात्म्य आले होते. त्याचवेळी भारतीय जवानांनी चीनचे 45 सैनिक ठार केले होते. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सैन्य स्तरावरील चर्चेनंतर दोन्ही देश मागे हटण्यावर सहमत झाले.
या प्रदेशातील तणाव अजूनही पूर्ण निवळलेला नाही. सीमा भागात पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला जात असल्याचे सैन्य प्रमुखांनी सांगितले. यावेळी जम्मू-काश्मीर संदर्भात सैन्य प्रमुख म्हणाले की, राज्यात सक्रिय असलेले 80 टक्के दहशतवादी पाकिस्तानी आहेत. परंतु, दहशतवादाचा योग्य पद्धतीने नायनाट करत आपण दहशतवादाकडून पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सैन्य प्रमुखांनी नमूद केले. एकूणच जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर संघर्षविराम सुरू आहे. पण तरीही घुसखोरीचा प्रयत्न केला जात असल्याचे द्विवेदी यांनी नमूद केले आहे.