बीड जिल्ह्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर बीड जिल्ह्यात तीव्र निदर्शने झाली असून यात मुख्य संशयित आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर येत आहे. दरम्यान वाल्मिक कराडचा ताबा बीड पोलिसांकडून SIT कडे देण्यात आला आहे. केज कोर्टात आज मकोका प्रकरणी सुनावणी होणार आहे. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वाल्मिकवर खुनाचा गुन्हा दाखल आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. काही आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असतानाच अजितदादांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या सूचनेनुसार रात्रीपासून सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार असल्याचंही सांगण्यात आले आहे. तसेच तालुक्याची जी कार्यकारिणी होती, तीदेखील बरखास्त करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळीमध्ये हजेरी लावत बीड जिल्ह्यातील कार्यकारिणीच्या बैठकीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला आहे . वाल्मिक कराड यांच्या मोक्काची कारवाई होण्यावरून परळी बंदची हाक देण्यात आली होती, आणि त्यासंदर्भात हिंसक आंदोलनं देखील करण्यात आली. या सगळ्या बाबींची चौकशी अजित पवार यांनी केली आहे.