आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवेश वर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.केजरीवाल आणि प्रवेशवर्मा यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .
माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पदयात्रा काढली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी केजरीवाल यांनी महर्षी वाल्मिकी मंदिर आणि प्राचीन हनुमान मंदिराला भेट दिली आणि देवाचे आशीर्वाद घेतले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी केजरीवाल म्हणाले की, ते दिल्लीतील अडीच कोटी जनतेला आशीर्वाद देण्याचे आवाहन करतात. जर त्यांचे सरकार पुन्हा स्थापन झाले तर दिल्लीतील शाळा, रुग्णालये, वीज सुधारण्यासाठी आणि महिलांना मानधन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तर आप नेते संदीप पाठक म्हणाले की, केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम्ही भूतकाळात माता आणि भगिनींसाठी काम करत आलो आहोत आणि भविष्यातही करत राहू. भाजपच्या लोकांनी आम आदमी पक्ष आणि आमच्या नेत्यांविरुद्ध कितीही कट रचला तरी दिल्लीतील जनता पुन्हा केजरीवाल यांना निवडून देणार आहे.
भाजप नेते प्रवेश वर्मा यांनीही उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोर्चा काढला. ते म्हणाले की, केजरीवाल यांचा जामीन जप्त होईल याची आम्ही खात्री करू. त्यांनी येथील गरीब लोकांचा विश्वासघात केला आहे आणि झोपडपट्टीवासीयांसाठी काहीही केले नाही.असा आरोप त्यांनी केला आहे.
कालकाजी मतदारसंघातील भाजप उमेदवार रमेश बिधुरी यांनी अमर कॉलनीतील डीएम कार्यालयात पोहोचून केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. काल, विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर रोहिणी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार विजेंद्र गुप्ता यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नंतर, माध्यमांना संबोधित करताना गुप्ता म्हणाले की, गेल्या तीन दशकांपासून रोहिणीच्या लोकांनी त्यांना खूप प्रेम दिले आहे. नामांकनाच्या वेळी त्यांच्यासोबत केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर उपस्थित होते. . दिल्ली प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी मालवीय नगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार बांसुरी स्वराज आणि बॉक्सर विजेंदर सिंग हे देखील त्यांच्यासोबत होते.
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी करोल बाग येथील भाजप उमेदवार दुष्यंत गौतम यांच्या नामांकनाला उपस्थिती लावली. ते म्हणाले की, केजरीवाल यांनी प्रामाणिकपणा आणि कामाच्या नावाखाली मते मागितली होती पण आज सत्य सर्वांसमोर आहे. हरियाणाच्या जनतेने भाजपला पाठिंबा दिला आहे आणि दिल्लीचीही जनता तेच करेल याची आम्हाला खात्री आहे.