आळंदी: संस्कृतभाषा देवभाषा आहे. तिचे रक्षण आणि संवर्धन आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन संस्कृत भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र संमेलनाचे अध्यक्ष शान्तिब्रह्म मारूतिबुवा कुऱ्हेकर महाराज यांनी केले आहे .
आळंदी येथे आयोजित संस्कृत भारतीच्या २५० प्रमुख कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय संमेलनात ते बोलत होते. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक या परिरासातून कार्यकर्ते संमेलनाला उपस्थित होते. संमेलनाला आळंदीतील वारकरी संप्रदायातील प्रमुख व्यक्ती व विद्यार्थी देखिल उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात कुऱ्हेकर महाराजांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या ग्रंथांच्या अध्ययनासाठी संस्कृत भाषेचे महत्त्वही लक्षात आणून दिले. पूर्णतः संस्कृत भाषेतून या संमेलनाचे संचालन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संस्कृत भारतीचे अखिल भारतीय गीता शिक्षण प्रमुख श्री. शिरीष भेडसगावकर उपस्थित होते. ते म्हणाले, “संस्कृत भाषेच्या अभ्यासाने मराठी व इतर प्रादेशिक भाषा समृद्ध होत असतात. नवीन शब्द निर्माण करण्यासाठी संस्कृत भाषेचे साहाय्य घ्यावे, असे आपल्या संविधानात म्हटले आहे. भारतीय ज्ञानपरंपरा मुख्यत: संस्कृत भाषेत असून, तिच्या रक्षणासाठी संस्कृतीचे संवर्धन आवश्यक आहे.
भारतीय कौटुंबिक मूल्ये, पर्यावरणाबद्दल प्रेम आणि सामाजिक समरसता हे आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ असल्याचे भेडसगावकर यांनी सांगितले. या मूल्यांना अधिक दृढ करण्यासाठी संस्कृत वाङ्मयाचा उपयोग करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. संस्कृतभारती ही संस्था गेली ४-५ दशके संस्कृत शिक्षण, संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण विश्वात कार्यरत आहे. संस्कृती रक्षण व त्यासाठी संस्कृत शिक्षण या कार्याचे उत्तरदायित्व हे प्रत्येकाने स्वतःच्या खांद्यावर घेण्याची आज गरज आहे, असे मत संस्कृतभारतीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष कर्नल सतीश परांजपे (निवृत्त) यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. माणिक शास्त्री, अशोक शास्त्री, डॉ. चिदंबर महाराज साखरे, जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे परमपूज्य गुरुवर्य भास्कर महाराज शिंदे, संस्थानचे राजाभाऊ चोपदार, रविदास शिरसाट, बाजीराव नाना उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त रविवारी (दि.१२) शोभायात्रा काढण्यात आली. संस्कृत भारतीचे प्रांत मंत्री विनय दुनाखे, आशिष घोडके, संस्कृत महाविद्यालयाचे शंकरराव देवरे, वारकरी शिक्षण संस्थेचे माणिक शास्त्री व आळंदीतील अनेक तरुणांनी हे संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले, अशी माहिती प्रांत मंत्री विनय दुनाखे यांनी दिली.