काही दिवसांपूर्वीच छत्तीसडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात आठ जवान शहीद झाले होते.हि घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा राज्यातील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेत दोन कमांडो जखमी झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याची घोषणा केली आहे. पण,अजूनही छत्तीसगमध्ये नक्षलवादी कारवाया सुरुच आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बासागुडा पोलीस स्टेशन परिसरात पहाटे घडली आहे . या घटनेत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कोब्रा युनिटचे दोन कमांडो जखमी झाले आहेत. कॉन्स्टेबल मृदुल बर्मन आणि मोहम्मद इशाक, असे जखमी जवानांची नावे आहेत. घटनेनंतर त्यांच्यावर बासागुडा सीआरपीएफ कॅम्पमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या दोन्ही जवानांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना राज्याची राजधानी रायपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
बस्तर प्रदेशात विजापूरसह 7 जिल्हे आहेत. या भागात नक्षलग्रस्त बस्तर गस्त घालणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी माओवादी अनेकदा रस्त्यांवर आणि जंगलातील पाऊल वाटांवर IED पेरतात. त्यामुळे या भागातील लोक अनेकदा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांत मरण पावतात. 12 जानेवारी रोजी सुकमा जिल्ह्यात अशाच स्फोटात 10 वर्षांची मुलगी जखमी झाली होती.
नवीन वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजेच 6 जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी विजापूरमध्ये आयईडीद्वारे जवानांचे वाहन उडवले होते. त्या घटनेत 8 पोलीस कर्मचारी आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. ही भीषण घटना कुटरू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अम्बेली गावाजवळ घडली. सुरक्षा जवान नक्षलविरोधी ऑपरेशननंतर आपल्या स्कॉर्पिओ वाहनाने परतत असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. गेल्या दोन वर्षांतील सुरक्षा जवानांवरील नक्षलवाद्यांचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.यानंतर पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी IED चा स्फोट घडवून आणला आहे.