अभिनेता सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला आतापर्यंत ताब्यात घेतले गेले नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी एका व्यक्तीला चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते, परंतु पोलिसांनी आता ही शक्यता फेटाळून लावली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेत कोणत्याही टोळीचा सहभाग असल्याची शक्यता नाकारली आहे. “हा फक्त चोरीचा प्रयत्न होता आणि या घटनेत कोणतीही टोळी सहभागी नाही…तसेच पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सैफ अली खानने कधीही कोणतीही सुरक्षा मागितली नव्हती. हा हल्ला कोणत्याही टोळीचा भाग नव्हता. आरोपी केवळ चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता. सैफ अली खान आणि संशयितामध्ये हाणामारी झाली ज्यामध्ये अभिनेता जखमी झाला असे विश्लेषण त्यांनी या घटनेचे केले आहे.
तत्पूर्वी, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असताना, शुक्रवारी लीलावती रुग्णालयातील डॉ. नितीन डांगे यांनी पुष्टी करत सैफ अली खान याची तब्येत पूर्णतः स्थिर असून त्याला अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. तसेच अर्धांगवायूची शक्यता फेटाळली आहे.
दरम्यान, डांगे म्हणाले की अभिनेत्याला पाठीवर झालेल्या जखमांमुळे संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचे सांगितले आहे.
आज सकाळी मुंबई पोलिसांनी सांगितले की त्यांनी सैफच्या पाठीतून काढलेल्या ब्लेडचा काही भाग ताब्यात घेतला आहे, तर उर्वरित भाग शोधण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.
मुंबई पोलिसांनी असेही म्हटले आहे की सुरु असलेल्या तपासादरम्यान अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील कथित आरोपी शेवटचा वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ दिसला होता आणि त्याला पकडण्यासाठी शोध सुरू आहे. घटनेनंतर संशयिताने सकाळी पहिली लोकल ट्रेन पकडली आणि वसई विरारकडे निघाला असा पोलिसांना संशय आहे. यानंतर मुंबई पोलिसांचे पथक वसई, नालासोपारा आणि विरार भागात शोध घेत आहे.