जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात गेल्या 37 दिवसांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. मात्र मृत्यूला कारणीभूत असलेल्या आजाराचे गूढ अद्याप अस्पष्ट आहे. सरकारच्या आदेशानुसार,आता या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
यासंदर्भात राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील ‘मृत्यू’चे गूढ अजूनही उलगडलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने अज्ञात आजारामुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर प्रशासन राजौरी जिल्ह्यातील बुधल गावातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.जम्मूमधील रुग्णालयात दाखल असलेल्या एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर), चंदीगड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)-इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) यांच्या तज्ज्ञ पथकांनी गेल्या एका महिन्यात नमुने गोळा केले आहेत आणि या मृत्यूंना कारणीभूत ठरू शकणाऱ्या कोणत्याही आजाराचा प्रसार झाल्याचे कोणत्याही अहवालात आढळलेले नसल्याचे म्हंटले आहे.