संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे (वय ८९) यांचे सोमवारी रात्री साडेदहा वाजता चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. आळंदी येथे आज मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना सोमवारी ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. साखरे महाराज यांच्या पश्चात मुलगी यमुना कंकाळ, मुलगा यशोधन साखरे, चिदम्बरेश्वर साखरे आहेत.
आळंदी येथील साधकाश्रमात गुरू-शिष्य परंपरेचा अंगीकार करून साखरे महाराज यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान, व्याकरणशास्त्र याचे अध्ययन केले. प्रख्यात तत्त्वज्ञ एन. पी. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शिक्षण घेतले.
१९६० मध्ये साधकाश्रमाची धुरा किसन महाराजांच्या हाती आली. तेव्हापासून निःस्वार्थीपणे कुठल्याही अडसर न ठेवता साधकाश्रमात ज्ञानार्जनासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले. कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन अनेक वर्षे घडविले. कीर्तन, प्रवचन करणारे हजारो विद्यार्थी त्यांनी घडविले.