मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व सर्व इतर संघटना यांच्यासह सोलापूर जिल्ह्याच्या वतीने उद्या 22 जानेवारी रोजी पंढरपुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, छत्रपती संभाजी राजे तसेच देशमुख कुटुंब उपस्थित राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मराठा समाजापेक्षा रेकॉर्डब्रेक गर्दीचा मोर्चा पंढरपुरात होईल असा विश्वास मराठा समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गुन्हेगारांना मोका जरी लागला असला तरी चार्जशीट दाखल होईपर्यंत राज्यातील मोर्चे सुरूच राहणार आहेत. असे मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहेच, परंतु परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची देखील पोलीस कोठडीत हत्या करण्यात आली असल्याचा आरोप आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या वतीने हा मोर्चा बुधवार 22 जानेवारीला सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे. या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच खासदार बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, दीपक केदार हे देखील उपस्थित राहणार असल्याचेही माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी सांगितले आहे.