डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. यामधील सर्वात धक्कादायक आणि अख्ख्या जगाला हादरवणारा निर्णय म्हणजे, अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच, जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेण्याची घोषणा केल्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. ट्रम्प यांनी WHO मधून अमेरिका बाहेर पडत असल्याचे जाहीर करताना त्याचे कारणही स्पष्ट केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात आजाराचे चुकीचे व्यवस्थापन आणि तसेच तातडीने सुधारणा राबवण्यात जागतिक आरोग्य संघटना अपयशी ठरल्याचा ठपका डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला आहे. तसेच, यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO अमेरिकेकडून जास्त आणि चीनकडून कमी पैसे घेते असल्याचा दावाही केला आहे. .
WHO वर दीर्घकाळ टीका करणारे ट्रम्प यांनी यापूर्वी जुलै २०२० मध्ये कोविड-१९ चा प्रसार सुरूच राहिल्याने अमेरिकेला WHO मधून औपचारिकपणे बाहेर पडावे लागेल अशी शक्यता व्यक्त केली होती.
संयुक्त राष्ट्रांची संस्था असलेल्या डब्ल्यूएचओची स्थापना 1948 मध्ये अमेरिकेच्या मदतीने झाली. डब्ल्यूएचओ ही संस्था जगभरातील आरोग्य आव्हानांना तोंड देते. तसेच साथीच्या आजारांवर देखील लक्ष ठेवते. महत्त्वाचे म्हणजे युद्धग्रस्त भागात देखील डब्ल्यूएचओ संस्था मदत पुरवते. या संस्थेचे वार्षिक बजेट सुमारे 6.8 अब्ज डॉलर्स आहे. यातील योगदानाचा सर्वात मोठा भाग अमेरिका देतो. मात्र चीनची लोकसंख्या सर्वात जास्त असूनही ते कमी पैसे देत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
दरम्यान, अमेरिका डब्ल्यूएचओमधून बाहेर पडत असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर आता टीका होताना दिसत आहे. अमेरिकेच्या आरोग्य कायदा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा निर्णय अमेरिकेसाठी योग्य ठरणार नाही. तसेच ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सामान्य लोकांसोबतच राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.