सोमवारी, 20 जानेवारी 2025 ला ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. शपथ घेताच ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अवैध प्रवाशांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे, ज्यामुळे भारतातून अवैधरित्या अमेरिकेत गेलेल्या हजारो भारतीयांचे भविष्य धोक्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर ज्या मोठ्या घोषणा केल्या त्यात अवैध प्रवाशांच्या मुद्द्याचाही समावेश होता. ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच, बेकायदेशीर प्रवेश ताबडतोब बंद केला जाईल आणि लाखो अवैध स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यामुळेच आता अमेरिकेत राहणाऱ्या अवैध स्थलांतरितांना धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावर भारत सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे.
भारतीयांनी जगाच्या कोपऱ्यात कुठेही राहिलं तरी तिथले नियम आणि कायद्याचं पालन करावे ,अशी भूमिका भारताने स्पष्ट केली आहे. ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अवैधरित्या अमेरिकेत राहणाऱ्या 18 हजार भारतीयांना परत पाठवले जाऊ शकते. या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका एकमेकांना सहकार्य करण्यास तयार आहेत.
बेकायदेशीर घुसखोरी हा ट्रम्प यांचा मोठा निवडणूक मुद्दा राहिला आहे. याविरोधात ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश जारी केला आहे. अमेरिकेच्या गृह विभागाने 2022 साली यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली होती. आता याबाबत काय निर्णय घेतला जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्याच्या काही दिवस आधीच बेकायदेशीरपणे अमेरिकेत आलेल्या नागरिकांना कायमचे रोखण्याची घोषणा त्यांनी केली होती.