अमेरिकेत कॅलिफोर्नियात पुन्हा एकदा अग्नितांडव सुरु झाला आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरु असलेली आग पुन्हा एकदा भडकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील ह्यूजेस भागात लागली असून या आगीत सुमारे १०,००० एकर क्षेत्र जळून खाक झाले असल्याची माहिती समोर आली आहे.ही आग वेगाने पसरत असून ५०,००० हून अधिक लोकांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले किंवा त्यांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ह्यूजेस फायर म्हणून ओळखली जाणारी ही आग १५ चौरस मैलांवर वेगाने पसरली आणि लोकप्रिय मनोरंजन स्थळ असलेल्या लेक कास्टेइकजवळ दाट धूर पसरल्याचे दिसून आले.
गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या ईटन आणि पॅलिसेड्स आगीमुळे या परिसराला धोका निर्माण झाला आहे. पत्रकार परिषदेत, कॅल फायरचे संचालक जो टायलर यांनी आग आटोक्यात आणण्यात त्यांना अजूनही आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचा इशारा दिला.३१,००० हून अधिक लोकांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर आणखी २३,००० जणांना इशारा देण्यात आला आहे. ४२ मैल प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियातील घरे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आत्तापर्यंत कॅलिफोर्नियाच्या जंगलांमध्ये ७८ हून अधिक वेळा आगीने तांडव केला आहे. यामुळे जंगलाजवळील निवासी क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत १९३३ मध्ये लॉस एंजेलिसमधील ग्रिफिथ पार्कला लागलेली आग ही कॅलिफोर्नियातील सर्वात भीषण आग होती. या आगीत सुमारे ८३ हजार एकर क्षेत्र जळून खाक झाले होते