हिंदी चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावरील झालेल्या चाकू हल्ला प्रकरणाची गेले अनेक दिवस चर्चा चालू आहे. सैफवर मागच्या आठवड्यात राहत्या घरी हल्ला झाला होता. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. दरम्यान या प्रकरणातील मुख्य हल्लेखोराला देखील अटक करण्यात आली आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानही लिलावती हॉस्पिटमधून घरी परतला आहे. मात्र आता या सर्व घडामोडीनंतर या प्रकरणाला नवे वळण आलेले दिसत आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी एवढ्या लवकर डिसचार्ज कसा दिला असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आता सैफवरील हल्ला संशयास्पद आहे. त्याने स्वतःच चाकू मारून घेतला की काय, अशी शंका असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत. आळंदीतील राम मंदिर उभारणीच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित हिंदू महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
मात्र हा हल्ला खरेच बांगलादेशी व्यक्तीने केला असेल तर मग ही गोष्ट गंभीर आहे. असे राणे म्हणाले आहेत. आधी बांगलादेशी अगोदर नाक्यावर उभे राहत होते. मात्र आता घरात घुसायला लागले आहेत. भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जय श्रीराम म्हणणाऱ्यांच्या घरात घूसून मारण्याचे प्रकार घडले आहेत. हिंदू समाज म्हणून एकत्र राहून जशास तसे उत्तर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राणे यांनी यावेळी केले आहे.. हिंदू राष्ट्रातील धर्मस्थळावर अतिक्रमणे केली जात आहेत. भविष्यात आळंदीकडेही वाकड्या नजरेने पाहतील. त्यासाठी हिंदू समाजाने दक्ष राहिले पाहिजे, असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
यावेळी त्यांनी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टिका केली आहे. खान, मलिक यांच्यावर हल्ले झाले तरच बारामतीच्या ताईला पुळका येतो मात्र सुशांत सिंगच्या आत्महत्येवर त्या गप्प असतात असे नमूद केले आहे.