आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मायकेल मार्टिन यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. संसदेत झालेल्या मतदानानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अलिकडेच मार्टिन यांची आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून निवड झाली आहे मार्टिन यांच्या ‘फियाना फेल’ पक्षाने आयर्लंडच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, परंतु त्यांना स्वतःहून सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना पुरेशा जागा मिळाल्या नव्हत्या.मात्र काही आठवड्यांच्या चर्चेनंतर, दीर्घकाळ वर्चस्व असलेल्या उजव्या विचारसरणीच्या पक्ष फियाना फेल आणि फाईन गेल यांनी अनेक अपक्ष खासदारांच्या पाठिंब्याने युती स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे. २९ नोव्हेंबर रोजी आयर्लंडमध्ये झालेल्या निवडणुकीत मार्टिन यांच्या ‘फियाना फेल’ पक्षाने १७४ पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या आणि ‘फाइन गेल’ पक्षाने ३८ जागा जिंकल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयर्लंडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल मायकेल मार्टिन यांचे अभिनंदन केले आहे आणि भारत-आयर्लंड द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितलेआहे, ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की ,
“आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल मायकेल मार्टिन यांचे अभिनंदन. सामायिक मूल्यांच्या मजबूत पायावर आणि लोकांमधील परस्पर संबंधांवर आधारित आमची द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहोत.