केंद्र सरकारने काल २५ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, इंजिनीअरिंग, व्यापार, उद्योग, शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांना या पुरस्कारांनी गौरवण्यात येते,
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश असतो. या पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.
. या नागरी पुरस्कारांमध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.त्यात महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश आहे. सुलेखनकार अच्युत पालव, उद्योग क्षेत्रातील प्रमुख चेहरा अरुंधती भट्टाचार्य, ज्येष्ठ अभिनेते अशोफ सराफ, गायिका अश्विनी भिडे देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, गायिका जसपिंदर नरुला, साहित्यिक मारुती चितमपल्ली, बासरी वादक राणेंद्र भानू मजुमदार, कृषीतज्ज्ञ सुभाष खेतूलाल शर्मा, चित्रकार वासुदे कामत, महाराष्ट्रातील होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.तर माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.