Republic Day : आज आपला देश ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत देखील कर्तव्य पथावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यंदाची प्रजासत्ताक दिनाची थीम ‘सुवर्ण भारत–वारसा आणि विकास’ अशी आहे. दरम्यान, यावर्षी परेड पाहण्यासाठी हजारो विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. दिल्लीतील या कार्यक्रमाला इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांना या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी झाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर आयोजित करण्यात आलेल्या परेडच्या माध्यमातून भारताकडून स्वतःच्या लष्करी ताकदीचे व सांस्कृतिक विविधतेचा प्रदर्शन केले गेले. यावेळी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सुरुवात ‘सारे जहाँ से अच्छा’ या गाण्यानं झाली. देशभरातील ३०० कलाकारांनी पारंपारिक वाद्यांवर ‘सारे जहाँ से अच्छा’ ही धून वाजवली आणि प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सुरुवात करण्यात आली.
इंडोनेशियाच्या मिलिटरी अकादमीचे मार्चिंग पथक
आज दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या परेडमध्ये इंडोनेशियाचा १६० सदस्यांचा मार्चिंग दल आणि १९० सदस्यांचा बँड दल देखील दिसून आला. त्यासोबतच इंडोनेशियन मिलिटरी अकादमीचा १९० सदस्यांचा ग्रुप बँड, जेंडरंग सुलिंग कानकुन लोकानंता आणि इंडोनेशियन नॅशनल आर्म्ड फोर्सेसच्या अर्थात टीएनआयच्या सर्व शाखांमधील १५२ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला मार्चिंग दल देखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील झाला.
गोव्याचा चित्ररथ
गोव्याचा चित्ररथ हा ‘स्वर्णिम भारत: विरासत और विकास’ या थीमवर आधारित होता. या चित्ररथामध्ये गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे आणि समृद्ध संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळालं.
क्षेपणास्त्रांची झलक
७६ व्या प्रजासत्ताक दिनी, दिल्लीतील कर्तव्यपथावर नवीन क्षेपणास्त्रे आणि लष्करी शस्त्रांची झलक पाहायला मिळाली. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, पिनाका मल्टी-लाँचर रॉकेट सिस्टीम, बीएम-२१ अग्निबान, १२२ मिमी मल्टीपल बॅरल रॉकेट लाँचर, आकाश शस्त्र प्रणाली प्रदर्शित करण्यात आली.
परेड कमांडरची राष्ट्रपतींना सलामी
प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परेड कमांडर लेफ्टनंट जनरल भवनिश कुमार आणि परेड सेकंड-इन-कमांड मेजर जनरल सुमित मेहता यांच्याकडून सलामी घेतली.
दिल्ली आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ
दिल्लीतील कर्तव्यपथ येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील चित्ररथं प्रदर्शित करण्यात आली. दिल्लीचा चित्ररथ भारतातील लोकांच्या सामूहिक आकांक्षांचे प्रतीक आहे. तर पश्चिम बंगालचा हा चित्ररथ राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा, कलात्मक परंपरांचे दर्शन घडवतो.