Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११:०० वाजता संसदेत २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.यावर्षी अर्थमंत्री म्हणून त्या सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली होती.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केले होते. आजच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये खाजगी गुंतवणुकीचा वेग आणखी वाढवण्याची गरज आहे. आर्थिक सर्वेक्षण-२०२५ मध्ये २०४७ पर्यंत भारताला विकसित देश कसे बनवायचे याचा संपूर्ण रोडमॅप देण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या पेहरावाच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधत असतात. यंदाच्या वर्षी त्यांनी परिधान केलेली साडी ही मधुबनी कलेल्या सन्मानार्थ तयार करण्यात आली असून, या निमित्ताने त्यांनी पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांच्या योगदानालाही देशासमोर आणले आहे.
आज सकाळी ८ च्या सुमारास निर्मला सीतारमण अर्थसंकल्पाच्या प्रतीसह राष्ट्रपतीभवनाकडे रवाना होत्या. अर्थसंकल्प राष्ट्रपतींकडे सुपूर्द केल्यानंतर आता त्या संसद भवन परिसरात पोचल्या आहेत.